
बेलगाव :
सीमाभागातील बेलगावात सार्वजनिक गणेशोत्सवाला अपार भव्यता व संस्कृतीची झलक लाभलेली आहे. महाराष्ट्रानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा असा अद्भुत सोहळा बेलगावातच पाहायला मिळतो. ह्याच परंपरेला एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने पुढे नेणारे मंडळ म्हणजे शाहापूर नाथ पाई चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
या वर्षी मंडळाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जात आहे.
*प्रारंभीचे स्वप्न – आजचे वास्तव*
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी शिवणसा भांडगे, गुणजीराव पाटील आणि सुरेश हे मूळ कारणीभूत ठरले. छोट्या संकल्पातून सुरू झालेली ही यात्रा आज सुवर्णमहोत्सवी जल्लोषापर्यंत पोहोचली आहे

गोकाक धबधबा, वृंदावन गार्डन, रस्त्यांचे डांबरीकरण, संगीत कारंजे, गुहा अशा कलात्मक सजावटींमुळे मंडळाने बेलगावकरांची मने जिंकली. प्रत्येक वर्षीची सजावट हीच भक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरते आणि उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण बनवते.
*यावर्षीचे आकर्षण – “काशी विश्वनाथ”*
सुवर्णोत्सवाच्या निमित्ताने या वर्षी मंडळाने काशी विश्वनाथाचे भव्य सजावट दर्शन घडवले आहे.
“नमामी गंगे” या शीर्षकाखाली पाण्याच्या प्रदूषणावरील सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

मंडळाची कलात्मक श्रीमूर्ती हे प्रसिद्ध शिल्पकार एम. जी. पाटील यांनी घडवली असून, काशी विश्वनाथाची सजावट ही युवा कलाकार साहिल कोकितकर यांनी डिझाइन केली आहे.
कलेचे सौंदर्य आणि सामाजिक जाणीव या दोन्हींचा समन्वय असलेली ही सजावट यावर्षीचे प्रमुख आकर्षण ठरली आहे.
*उत्सवाची सांस्कृतिक पार्श्वभूमी*
१५ ऑगस्ट रोजी मूर्ती आगमन मिरवणूक दिमाखात पार पडली. त्याआधी रक्तदान शिबिर घेऊन सुवर्णोत्सवाला समाजोपयोगी रंग देण्यात आला.
गणेशचतुर्थीला श्रीमूर्ती प्रतिष्ठापना, पूजा, आरती व प्रसादवाटप होणार आहे. त्यानंतर आठ दिवस विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस, हेस्कॉम कर्मचारी, शिक्षक, जनप्रतिनिधी व समाजातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.
वडगावचे ज्ञानेश्वर भजन मंडळ व भारतनगरचे भक्ती महिला भजन मंडळ यांच्या सुमधुर भजनगायनासह महिलांचे मंगळागौर कार्यक्रम पार पडले.
व्यसनमुक्ती जागृती व्याख्यान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू वृद्धांना चादरींचे वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन झाले.
दररोज संध्याकाळी आरतीनंतर विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप करण्याची परंपराही या वर्षी मंडळाने ठेवली आहे.
*सामाजिक बांधिलकीचा उत्सव*
मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी यावर्षी उत्सवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
“समाजाला देणे हाच खरा सेवा धर्म आहे. म्हणून सुवर्णोत्सव केवळ भव्य सोहळाच नव्हे, तर एक समाजोपयोगी चळवळ ठरावी अशी आमची इच्छा आहे,” असे ते म्हणाले.
*भक्ती – संस्कृती – समाज यांचा संगम*
बॅरिस्टर नाथ पाई चौकाचा गणेशोत्सव हा केवळ मूर्ती सजावटीपुरताच मर्यादित नाही. इथे भक्तीची शक्ती, संस्कृतीचे सौंदर्य आणि समाजाचे बंध हे तिन्ही मार्ग एकत्र येतात.
सुवर्णोत्सवाचे हे विशेष वर्ष बेलगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात एक अमूल्य अध्याय म्हणून नोंदवले जाईल हे नक्की.