गणेश विसर्जन मिरवणूक
“परंपरागत मार्गच अंतिम – पोलिसांना अभय यांची कडक इशारा”

बेळगाव :
सीमाभागातील बेळगावच्या गणेशोत्सवात पोलीस अनावश्यक त्रास देत राहिले, तर त्याचे परिणाम गंभीर होतील, हे नक्की! शहापूर येथील संतसेना मंगल कार्यालयात पार पडलेल्या ८० हून अधिक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार अभय पाटील यांनी हा इशारा दिला.
“गेल्यावेळीप्रमाणे यावेळीदेखील परंपरागत मार्गावरूनच विसर्जन मिरवणूक होणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही,” असा मंडळांचा ठाम अभिप्राय मांडत त्यांनी जाहीर केले.

“विसर्जन मिरवणुकीचा मार्ग हा पिढ्यानपिढ्यांचा परंपरागत मार्ग आहे. त्यावरूनच गणेश मूर्ती निघते. यात पोलीसांचा दबाव किंवा धाक-धमकी काही चालणार नाही,” असे पाटील यांनी कडक शब्दांत स्पष्ट केले.
यासंदर्भात पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“विसर्जन दिवशी फटाके, डॉल्बी, बेस–टॉप ही सर्व हिंदू परंपरेची अविभाज्य अंग आहेत. हे बंद करा असे पोलीस सांगत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. गणेश मिरवणुकीचा उत्साह कोणीही कमी करू शकत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
*दारोडेखोर की मंडळवाले?*
*काही मंडळांकडून पोलीसांनी बांड लिहून घेतल्याच्या प्रकारावर आमदार पाटील संताप व्यक्त करत म्हणाले, “इथले गणेशोत्सव मंडळवाले काय दरोडेखोर आहेत का? पोलिस असे का वागत आहेत? पुढे सावध राहावं,” असा प्रश्न उपस्थित केला.*
“पोलिसांनी घेतलेल्या बांडावर फक्त सह्या करून घेतल्या आहेत. आता हे बांड गायब झाले किंवा त्यात काही फेरफार झाला, तर जबाबदार कोण?” असा थेट सवालही त्यांनी केला.

*थेट आव्हान :*
“आज डॉल्बी तलावाजवळ बंद करा म्हणतात, उद्या मंडपाजवळसुद्धा थांबवा म्हणतील. अशा प्रकारे नियमावर नियम लादले, तर उत्सवाचं काय होईल? हिंदूंच्या सणालाच असे नियम का? फटाके वाजवू नका म्हटलं तर आम्ही गोटी खेळायची का?” असा जळजळीत सवाल आमदारांनी केला.
“पोलिस कितीही धमक्या दिल्या तरी घाबरू नका. तुमच्या मागे संपूर्ण बेळगाव उभं आहे. थेट महा-मंडळाला किंवा मला कळवा,” असा विश्वासही त्यांनी मंडळांना दिला.
“आम्हालाही शांतता हवी आहे. उत्सव भव्यतेने पार पडावा. घराघरांत लोकांनी बसून आनंदाने गणेशाची पूजा करावी. पण शांततेच्या नावाखाली पोलिसांची दडपशाही आम्हाला मान्य नाही,” असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले.
सभेत लोकराज्य महा-मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील जाधव, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, श्याम बसूरकर, गिरीश धोोंगडी, नितीन जाधव, जयंत जाधव, महादेव राठोड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.