बेळगाव महापालिका ‘यूजीडी समस्येवर रोबोयुक्त उपाय’

बेळगाव महापालिका
‘यूजीडी समस्येवर रोबोयुक्त उपाय’

बेळगाव:
सीमाभागातील बेळगाव महापालिकेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात दररोज उद्भवणाऱ्या यूजीडी (अंतर्गत मलनिस्सारण) समस्यांवर तात्काळ उपाय शोधण्याच्या दृष्टीने, पालिकेने आता तांत्रिक मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात केली असून, यासाठी रोबोटिक इन्स्पेक्शन मशिनचे प्रायोगिक प्रदर्शन करण्यात आले.

शहरातील हनुमाननगर परिसरात महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, सत्ताधारी पक्षनेते हणमंत कोनगली तसेच विविध नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रयोग करण्यात आला.

यावेळी कंपनीच्या तज्ज्ञांनी या मशिनच्या कार्यप्रणाली, कार्यक्षमता व तांत्रिक बाबींविषयी सविस्तर माहिती दिली.
ही यंत्रणा थेट ड्रेनेजमध्ये उतरून ब्लॉकेज, लीक, पाण्याच्या मिसळीसारख्या समस्यांना कॅमेऱ्यांच्या व सेन्सर्सच्या सहाय्याने अचूकपणे शोधून काढते. पाइपलाईनच्या आतील प्रत्यक्ष चित्रे ‘लाईव्ह’ दाखवणारी ही प्रणाली यूजीडी व्यवस्थापनासाठी एक उत्तम उदाहरण ठरते. पाईप्स कोसळण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे.


या यंत्राची किंमत सुमारे २७ लाख रुपये आहे. कंपनी एक महिन्याची मोफत प्रशिक्षण सेवा देणार आहे. याशिवाय, ५.५ कोटी रुपये खर्च केल्यास पुढील तीन वर्षांसाठी देखभाल आणि सेवा पुरवण्याचा करारदेखील कंपनीसोबत होणार आहे.

महापौर मंगेश पवार यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे कोणत्याही पालिका कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होणार नाही. “ही रोबोटिक मशिन केवळ अडचणी शोधण्यासाठी आहे, कामगारांची गरज कायम राहील,” असे त्यांनी सांगितले.

या मशिनची खरेदी करावी की नाही, यावर सर्व सदस्यांनी सकारात्मक व नकारात्मक बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उपमहापौर वाणी जोशी यांनी सांगितले की, गरज आणि यशस्वी परिणाम यांच्यावर आधारित निर्णय घेतला जाईल.


बदलाची चाहूल

आरोग्य आणि शहरी स्वच्छतेच्या दृष्टीने ही यंत्रणा फार महत्त्वाची ठरू शकते. मानवी श्रमाऐवजी यंत्रशक्तीचा वापर, अचूक व्यवस्थापन व जलद समस्या शोधण्यामुळे ड्रेनेजमध्ये निर्माण होणारे अपघात व विलंब टाळता येतील.
ही यंत्रणा शहरी स्वच्छतेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करण्याची नांदी ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!