बेळगाव,
ऐतिहासिक परंपरेने समृद्ध असलेल्या बेळगावातील टिळकवाडी परिसरातील रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) प्रकल्प आता तीव्र वादाचा विषय बनला आहे. शेकडो घरे, शाळा, मंदिरे आणि व्यापारी प्रतिष्ठानांच्या जीवनवाहिनी असलेल्या मुख्य रस्त्यावरच हा प्रकल्प उभारला जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे.
” *आमचा हक्क, आमचा मार्ग”*
या घोषणेसह टिळकवाडीचे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.

*सत्तेचा अहंकार?*
टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेटजवळ (LC 382) 32.43 कोटी रुपयांच्या खर्चाने ROB च्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हा विकास नव्हे तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्यावर घाला असल्याचे आरोप नागरिकांकडून येत आहेत.
” *गणपतीला वाट बंद?” — धार्मिक ठिकाणांना धोका*
या ROB प्रकल्पामुळे शतकांपासून अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक गणेश मंदिराचाही नाश होण्याची शक्यता आहे. “आमच्या धार्मिक अधिकारांवर आघात होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

*विद्यार्थ्यांच्या भविष्याला धोका!*
या मार्गावर दररोज 6,000 हून अधिक विद्यार्थी चालत जातात. ROB प्रकल्पामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. “शिक्षणप्रति कटिबद्ध असलेल्या देशाने मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये,” असे पालकांचे म्हणणे आहे.
*व्यापारी अडचणीत*
ROB चे काम सुरू झाल्यापासून अनेक दुकानांनी आपली शटर बंद केली आहे. व्यापार घटला असून, उदरनिर्वाहाची घडी विस्कळीत झाली आहे. “ROB पूर्ण होईपर्यंत आम्ही जगू की नाही याची खात्री नाही,” असे व्यापाऱ्यांचे दु:ख आहे.
*विज्ञानविरोधी प्रकल्प?*
याच रस्त्यावर अवघ्या 600 मीटर अंतरावर LC 381 आणि LC 383 असे दोन ROB आधीच अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या ROB ची गरज काय? हा निधीचा अपव्यय असून, वाहतूक नियोजनाच्या तत्त्वांना विरोधात जाणारा निर्णय आहे, असा लोकांचा सूर आहे.

*आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाही अडथळा*
या ROB प्रकल्पामुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा गंभीरपणे प्रभावित होणार आहेत. “रुग्णालयांचा रस्ता बंद करणे म्हणजे जीवाशी खेळणे,” असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
” *मेट्रो शैलीतील वायाडक्ट” पर्याय?*
वाहतूक तज्ज्ञ आणि स्थानिकांनी याला पर्याय म्हणून Elevated Railway Track (Via Duct) म्हणजेच मेट्रो धर्तीवरील उन्नत मार्ग सुचवला आहे. हा पर्याय वाहतुकीस अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
*1000 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन मोदींना*
या ROB विरोधात 1000 हून अधिक नागरिकांनी सह्या केलेले निवेदन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवले आहे. आता “त्यांच्याच हस्तक्षेपाने प्रकल्पाचा मार्ग बदलेल का?” असा प्रश्न बेळगावात घोंगावत आहे.
*रेल्वे विभागाचे उत्तर: प्रकल्पात बदल शक्य नाही*

रेल्वे विभागाने दिलेल्या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की, नियोजित Alignment मध्ये कोणताही बदल शक्य नाही. “T” आकाराच्या डिझाईनला IRC मानकांनुसार मान्यता नाही. जमिनी अधिग्रहण प्रक्रियाही सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
*शेवटची चर्चा?*
रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि स्थानिकांसह बैठक बोलावली आहे. नागरिकांच्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी समुपदेशन अपेक्षित आहे.
*बेळगाव काय ठरवतं? मोदी काय ठरवणार?*
हा केवळ एक ROB प्रकल्प नाही — हा एका शहराच्या आणि तिथल्या नागरिकांच्या भविष्याबाबतचा आवाज आहे. या आवाजाला मोदी उत्तर देतात का, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.