महापौर–उपमहापौरांची दुचाकीवरून शहर गस्त : रस्त्यावर कचरा टाकला तर थेट घरापर्यंत दंड

थंडीला हरवणारी “क्लीन सिटी” मोहीम!

महापौर–उपमहापौरांची दुचाकीवरून शहर गस्त : रस्त्यावर कचरा टाकला तर थेट घरापर्यंत दंड

आता बेळगावीतील रस्ते, मोकळी मैदाने आणि पादचारी मार्ग कचरा टाकण्याची ठिकाणे राहिलेली नाहीत. कुठेही कचरा टाकल्यास संबंधित व्यक्तीच्या घराच्या दारापर्यंत थेट दंड पोहोचणार आहे. बेंगळूर महापालिकेच्या कडक आणि प्रभावी उपाययोजनांचा अवलंब करत बेळगावी महापालिकेने “क्लीन सिटी बेळगाव” मोहिमेला गती दिली आहे.

कोणत्याही जाहिराती, घोषणा किंवा दिखाऊ प्रचाराशिवाय गेल्या एका महिन्यापासून महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी हे दुचाकीवरून शहरातील रस्त्यांवर फेरफटका मारत आहेत. पहाटेची कडाक्याची थंडी झुगारून दररोज तीन ते चार तास ते रस्त्यावर उतरून नागरिकांना स्वच्छतेचे थेट धडे देत आहेत. महापौर व उपमहापौरांसोबत आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यावरण अभियंते तसेच आरोग्य निरीक्षक या मोहिमेत सहभागी झाले असून स्वच्छता कागदावर नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावरच असते. हा संदेश संपूर्ण शहरात पोहोचवला जात आहे.

कचऱ्याच्या पिशव्याच ठरल्या पुरावा

सोमवारी सकाळी 5.30 वाजल्यापासूनच महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शहापूर व खासबाग परिसरात कारवाई सुरू केली. नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याच्या पिशव्या जागेवरच उघडून तपासण्यात आल्या. त्यामध्ये सापडलेल्या झोमॅटो, वीज व पाणी बिलांच्या आधारे कचरा टाकणाऱ्यांचा पत्ता शोधण्यात आला. पत्ता निश्चित होताच महापालिका कर्मचारी थेट घरापर्यंत जाऊन पावती देत दंड वसूल केला. तसेच जागेवरच कचरा टाकताना आढळलेल्या व्यक्तींवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. बेळगाव महापालिकेच्या या वेगळ्या आणि कडक कारवाईने स्थानिक नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत.

इशारा संपला – कारवाई सुरू
कचरा रस्त्यावर नाही तर घरच्या कचरापेटीतच कचरा टाका, असे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे. येत्याकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महापौर व उपमहापौरांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.

शांतपणे सुरू झालेली ही मोहीम आता संपूर्ण बेळगाव शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ दंड वसूल करणे हा उद्देश नसून नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हेच या मोहिमेचे खरे उद्दिष्ट असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. “क्लीन सिटी बेळगाव” प्रत्यक्षात आणण्यासाठी ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाची गरज आहे, असा संदेश देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!