
महिला शक्ती, विकास आणि राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मतदारसंघाला राष्ट्रीय पातळीवर गौरव
बेळगाव :
“बेळगाव दक्षिण मतदारसंघ आज देशासाठी आदर्श ठरला आहे,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली. केंद्र अर्थसंकल्पावरील महिला संवाद आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रभाकर कोरे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार अभय पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांनी मतदारसंघाच्या विकास मॉडेलला राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केले.

दक्षिण मतदारसंघात महिलांना शंभर टक्के प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रशासन, संघटना आणि सार्वजनिक जीवनात महिलांचा सक्रिय सहभाग ही या मतदारसंघाची ताकद आहे. याच कारणामुळे दक्षिण मतदारसंघ देशासाठी आदर्श ठरला आहे,” असे विजयेंद्र म्हणाले.

विकास, महिला सक्षमीकरण आणि संघटनात्मक बळ – या तीन घटकांच्या समन्वयातून दक्षिण मतदारसंघाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतर मतदारसंघांनीही हा आदर्श स्वीकारावा,” असे त्यांनी मत व्यक्त केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणे ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे सांगत त्यांनी म्हटले, “त्या कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकरी, महिला, युवक आणि गरीब घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना विकासाला चालना देत आहेत. आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदी नियुक्त करणे हे महिला शक्तीवरील विश्वासाचे प्रतीक आहे.”

राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “काँग्रेस सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. पाच हमी योजना या केवळ राजकीय फायद्यासाठी आहेत. करप्रश्नी केंद्रावर केलेले आरोप योग्य नाहीत. सक्षम आर्थिक धोरणांमुळे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.”

“कोरे राज्यपाल व्हावेत” – अभय पाटील
आमदार अभय पाटील म्हणाले, “पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रभाकर कोरे यांचा उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण भाजपच्या वतीने सत्कार करणे अभिमानाची बाब आहे. त्यांनी राज्यपाल व्हावे, ही या भागातील जनतेची अपेक्षा आहे.”
“महिला शक्ती निर्णायक” – डॉ. कोरे
सत्कार स्वीकारताना पद्मश्री डॉ. बा. प्रभाकर कोरे म्हणाले, “देशातील महिला शक्ती अत्यंत सामर्थ्यवान आहे. निर्मला सीतारामन यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणे विशेष आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण लागू होणार असून त्यामुळे अधिक संधी उपलब्ध होतील. आगामी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे; भाजप सत्तेत येईल,” असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. महिला शक्तीकडून सत्कार स्वीकारताना आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
“अर्थसंकल्प देशविकासाला पूरक” – केशव उपाध्याय
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी महिला शक्तीची ओळख पटवली आहे. गेल्या नऊ वर्षांत निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला प्रत्येक अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक प्रगतीस पूरक ठरला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मोदी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.”
माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, केंद्र सरकारच्या आर्थिक शिस्तीच्या धोरणांमुळे देशाच्या विकासाला भक्कम पाया मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिलेले प्रोत्साहन समाजावर दीर्घकालीन परिणाम घडवेल.
कार्यक्रमाला संजय पाटील, महांतेश कवटगिमठ, गीता सुतार, सुभाष पाटील, अरविंद पाटील, अरुण शहापूर, रमेश देशपांडे, भैरप्पनवर, बडवणाचे आदी उपस्थित होते.

