पावसाळा : नाला आणि गटारी स्वच्छतेसाठी सूचना

बेळगाव : पावसाळ्याची सुरुवात झाल्याने शहरातील अंतर्गत गटारी आणि नाल्यांची तातडीने स्वच्छता करावी, अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी दिली.

महानगरपालिका परिषदेच्या सभागृहात पावसाळ्यातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय तातडीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सुरू असलेल्या कामांना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

पावसाळा सुरू होण्याआधीच सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन जिथे जिथे समस्या आहेत, त्या ओळखून शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करावीत, असे महापौर म्हणाले.

महापालिकेचे काँग्रेस सदस्य रियाज किल्लेदार म्हणाले, माझ्या प्रभागात सुमारे 150 घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरते. अभियंत्यांना विचारले असता त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगतात. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

भाजप सदस्या वीणा विजापूरे म्हणाल्या, गणेशनगरमध्ये अंतर्गत गटारीचे काम मंजूर होऊन दोन वर्षे झाली, तरी अद्याप काम सुरू झालेले नाही.

भाजप सदस्य श्रेयस म्हणाले, साई हॉलजवळ नाला होता, परंतु अतिक्रमण झाल्याने नाला अदृश्य झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरून नागरिकांना त्रास होत आहे. यावर सर्वे करून नाला साफ करावा, अशी मागणी त्यांनी केली.

नियुक्त सदस्य मुस्ताक म्हणाले, आश्रय वसाहतीत सार्वजनिक शौचालय नसल्याने लोक रात्री उघड्यावर जातात. त्यामुळे येथे तातडीने सार्वजनिक शौचालय बांधावे, अशी विनंती त्यांनी केली.

आश्रय वसाहतीतील नागरिक डोंगर उतारावर शौचासाठी जात आहेत. येथे अनेक समस्या असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असेही त्यांनी नमूद केले.

उपमहापौर वाणी विलास जोशी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मुजमिल डोणी, महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!