कॉंग्रेसची कामगिरी घरोघरी पोहोचवावी” – राहुल जारकीहोळी

बेळगावमध्ये भव्य बाईक रॅली, कार्यकर्त्यांना संघटना बळकट करण्याचे आवाहन

बेळगाव –
राज्यातील कॉंग्रेस सरकारने राबवलेल्या गॅरंटी योजना गरीबांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केल्या असल्या तरी, प्रचाराच्या अभावामुळे त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पूर्णतः पोहोचल्या नाहीत, असे मत राज्य युवा कॉंग्रेसचे प्रधान सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

बेळगाव शहरातील जिल्हा कॉंग्रेस भवनात आयोजित शहर युवा कॉंग्रेस समितीच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.

“या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कॉंग्रेसच्या योजना आणि सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले.
*योजनांच्या प्रभावासाठी प्रचार अनिवार्य*

“फक्त योजना राबवण्यावरच न थांबता, त्या योजनांचा परिणाम लोकांच्या मनामध्ये रुजेल अशा पद्धतीने प्रचार केला गेला पाहिजे. यावर्षी सरकारने ५२ हजार कोटी रुपयांचा जनहित बजेट सादर केला आहे. मात्र प्रचाराच्या कमतरतेमुळे त्याचा परिणाम मर्यादित राहिला आहे,” असे त्यांनी खंतपूर्वक नमूद केले.

“बूथ पातळीपासून संघटनात्मक बळकटता हवी. स्थानिक प्रश्नांना तत्काळ उत्तर देण्याची कार्यपद्धती तयार केली, तर मत आपोआप कॉंग्रेसच्या दिशेने येईल,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सांगितले.

*निवडणुका जवळ – कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश*

“पुढील ग्रामपंचायत व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी युवा कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे. जनतेच्या अडचणी समजून घेऊन, तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या संघटनेचे प्रतिमान आपण तयार केले पाहिजे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

“ *सतीश जारकीहोळींची सेवा माझ्यासाठी प्रेरणा”*

“मी माझे वडील आणि लोकनिर्माण मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. त्यांनी घटप्रभा येथे मोफत शिक्षण आणि रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करून शेकडो युवकांना नवसंजीवनी दिली आहे. अशा समाजोपयोगी कामांमुळेच खरी संघटना मजबूत होते,” असे राहुल जारकीहोळी म्हणाले.
*युवकांच्या जोशात बाईक रॅली*

कार्यकारी बैठकीपूर्वी राणी चन्नम्मा चौक ते जिल्हा कॉंग्रेस कार्यालयापर्यंत युवक कॉंग्रेसच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी दुचाकी रॅलीत सहभागी होत नवभारताच्या कॉंग्रेस धोरणांचा जयघोष केला.

लक्ष्मणराव चिंगळे – BUDA अध्यक्ष
विनय नावळट्टी – जिल्हा अध्यक्ष
मंजूनाथ गौडा – राज्य युवा कॉंग्रेस अध्यक्ष
दीपिका रेड्डी – उपाध्यक्षा
प्रदीप एम.जे, सिद्दीक अंलकळी, श्रीधर जाधव, सिद्धू हळ्ळिगौड, इम्रान अंलकळी, नौमान मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!