असली तरी नसल्यासारखी बेलगाव महानगरपालिका!
गणेशोत्सवाच्या तयारीत ९० टक्के काम महानगरपालिकेचं… पण क्रेडिट? इतरांच्या खात्यात!
मेयर–नगरसेवकांना बाजूला ठेवून अधिकाऱ्यांच्या बैठका; महानगरपालिकेचं अस्तित्वच प्रश्नांकित
“बेलगाव महानगरपालिका: खेळात आहे, पण हिशेबात नाही!”
स्वच्छता–प्रकाश–सौंदर्यीकरणात पालिकेची मेहनत, पण निर्णयांमध्ये मात्र नाव नाही
बेलगाव
पूर्वी गणेशोत्सव महासभा म्हटली की — महानगरपालिकेच्या मेयरांचं अध्यक्षस्थान, आयुक्तांची उपस्थिती, पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग – हे सगळं ठरलेलं असायचं. पण यंदा चित्रच बदललं आहे.
महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन केवळ जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीच झालं. मेयर? उपमेयर? आयुक्त? – कुणालाही निमंत्रणच नाही. स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकींनाही नगरसेवकांना बोलावलं नाही, हे तर अजूनच आश्चर्यकारक आहे.
पालिकेची मेहनत – इतरांचं नाव
गणेशोत्सवाच्या जबाबदारीत महानगरपालिकेचं योगदान मोठं आहे. शहरातील ९० टक्के तयारी – स्वच्छता, खड्डे भरने, प्रकाशयोजना, सजावट – हे सर्व महानगरपालिकेच्या खांद्यावर आहे. केवळ बंदोबस्त ही पोलिसांची जबाबदारी. तरीसुद्धा पालिकेला पूर्णपणे बाजूला ठेवून बैठक घेण्यात आल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे फक्त दुर्लक्ष आहे का? की मुद्दामहून पालिकेचा प्रभाव कमी करण्याचा डाव? असा संशय अधिकच बळावतो आहे.
मौन हेच पालिकेचं शत्रू
या परिस्थितीतही मेयर, सत्ताधारी पक्षाचे नेते, नगरसेवक गप्प बसलेले दिसत आहेत. हे मौन हीच मोठी धोक्याची घंटा आहे. मौन सुरूच राहिलं तर लोकांमध्ये “पालिका असली तरी नसल्यासारखीच” अशी भावना घट्ट होणं अपरिहार्य ठरेल.
सन्मान वाचवण्याची जबाबदारी
बेलगाव महानगरपालिकेचा सन्मान जपण्यासाठी मेयर आणि नगरसेवकांनी आत्ताच आवाज उठवला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात या सीमाभागातील महानगरपालिका फक्त नावापुरतीच राहण्याचा मोठा धोका आहे.

