टिळकवाडी सरकारी शाळेसमोर उपमहापौर वाणी विलास जोशी यांच्याकडून विशेष स्वच्छता मोहीम
बेळगाव:
उद्याचे भविष्य घडवणाऱ्या टिळकवाडी येथील सरकारी कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५ समोर दररोज कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी पसरलेली होती. त्यामुळे मुलांना शाळेत जाणेही अवघड झाले होते. या दुर्दशेला आज उपमहापौर वाणी विलास जोशी यांनी स्वतः भेट देऊन आळा घातला.
स्थानिकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, मंगळवारी सकाळी शाळेच्या गेटसमोरील कचरा पूर्णपणे हटवून त्यांनी त्या ठिकाणी तुळशीचे रोप लावून स्वच्छता व संस्काराचा संदेश दिला.

“मुलांचे शिक्षण होणारे ठिकाण कचऱ्याने भरलेले असू नये. हे त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र स्थान आहे,” असे वाणी जोशी यांनी सांगितले.
कचऱ्यामुळे झाकोळलेले शाळेचे प्रवेशद्वार आज तुळशीमुळे उजळून निघाले आहे. स्थानिक नागरिक, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, “हे केवळ स्वच्छतेचे काम नाही, तर मुलांच्या जीवनाचा सन्मान आहे,” असे मत व्यक्त केले.

टिळकवाडी येथे उपमहापौरांनी नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण बेळगाव शहरात कौतुक होत आहे.

