Headlines

स्वच्छता कामगार हे समाजाचा खरा पाया”

वेधांत फाउंडेशनच्या कार्यक्रमात महापौरांचे वक्तव्य “
बेळगावी :
समाजनिर्मितीत सर्व स्तरातील नागरिकांइतकेच स्वच्छता कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे बेळगावी महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार यांनी सांगितले. वेधांत फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक–पत्रकार–पोलीस सन्मान समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले, “शिक्षक मुलांचे भविष्य घडवतात, पत्रकार समाजाचे डोळे आहेत आणि पोलीस कायदा व सुव्यवस्था राखतात. मात्र या सर्वांसोबत शहर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कामगार हेही समाजाचे खरे हिरो आहेत. त्यांच्याशिवाय शहराचे जीवन विस्कळीत होईल.”
स्वच्छता कामगारांच्या सेवेलाही समाजाने योग्य सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांनी आयोजकांकडे केली.
“आपण पुरस्कार आणि सन्मान देताना केवळ व्यासपीठावरील लोकांनाच नव्हे, तर रस्त्यांवर व गटारांमध्ये काम करणाऱ्यांच्या सेवेचेही स्मरण ठेवले पाहिजे,” असे ते म्हणाले.
‘प्लास्टिकमुक्त बेळगावी’ ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. सरकारच नव्हे तर नागरिकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे, असे महापौरांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या उपमहापौर वाणी जोशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. फास्ट-फूड संस्कृतीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, असेही त्या म्हणाल्या.
डीसीपी निरंजनराजे अरस, झुवारी अ‍ॅग्रो केमिकल्सचे माजी उपाध्यक्ष आर. वाय. पाटील, संतोष जैनोजी, लिंगराज जगजंपी, वीरेश किवडसन्नवर आदींनीही आपले विचार व्यक्त केले.

उद्योजक अशोक नायक यांनी सांगितले की, चांगल्या समाजनिर्मितीसाठी शिक्षक, पत्रकार आणि पोलीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या तीन घटकांच्या समर्पित सेवेमुळेच सुदृढ समाज घडतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एम. चौगुले म्हणाले की, उत्तम शिक्षक, प्रामाणिक पत्रकार आणि निष्ठावान पोलीस समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात.
वेधांत फाउंडेशनतर्फे संयुक्त कर्नाटकचे मुख्य वार्ताहर विलास जोशी, पुढारीचे मुख्य प्रतिनिधी जितेंद्र शिंदे, सकाळचे बी. बी. देसाई, शिक्षक शेखर करंबेळकर, युवराज रत्नाकर, कल्लप्प पाटील, उमेश बालेकुंद्री, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत उप्पार यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानितांच्या वतीने बी. बी. देसाई आणि शेखर करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सी. ए. जीवन शहापूरकर, धनश्री सोसायटीचे अध्यक्ष नितीन येतोजी, व्ही. के. शृंगेरी, फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, संस्थापक सतीश पाटील, उपाध्यक्ष कल्लप्प कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर एन. डी. मादार यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!