Headlines

शाश्वत शहरांच्या दिशेने राष्ट्रीय चिंतन -भोपाळमध्ये ३ दिवसांची धोरणात्मक परिषद |


बेळगाव:
वेगाने विस्तारत असलेल्या शहरांना भेडसावणाऱ्या पर्यावरणीय, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, शाश्वत शहरी विकास विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक परिषद भोपाळ येथे तीन दिवसांसाठी सुरू झाली आहे.
देशातील विविध राज्यांतून आलेले महापौर आणि उपमहापौर या परिषदेत सहभागी झाले असून, पर्यावरणपूरक, लोककेंद्रित आणि दीर्घकालीन शहरी विकास मॉडेल उभारण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सोशल गव्हर्नमेंटचे संयुक्त कार्यदर्शक जगदीश हिरेमनी यांनीही या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत सहभाग घेतला आहे.

सध्याच्या परिस्थितीत शहरी विकासाची दिशा बदलण्याची गरज स्पष्ट होत असून, या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही धोरणात्मक परिषद भविष्यातील शहरांसाठी मार्गदर्शक ठरणारी महत्त्वाची व्यासपीठ ठरली आहे.
हरित शहरी नियोजनावर भर
शहरांच्या मास्टर प्लॅनमध्ये हरित क्षेत्रे, सार्वजनिक जागा आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्यात यावे, या मताला परिषदेत बहुमत मिळाले. काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित होत असलेल्या शहरांऐवजी मानवकेंद्रित शहरी रचना आवश्यक असल्याचे सहभागी प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनावर नवे विचार
घनकचऱ्याची विल्हेवाट, पुनर्वापर (रीसायकलिंग) तसेच शून्य कचरा शहरांची संकल्पना यावर विशेष सत्रे झाली. कचऱ्याकडे समस्या म्हणून न पाहता संपत्ती म्हणून वापरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
स्मार्ट व हरित शहरांचा संकल्प
नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रशासनाचा प्रभावी वापर करून शहरांना हरित बनवणे शक्य असल्याबाबत चर्चा झाली. तंत्रज्ञान आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोलच भविष्यातील शहरांची खरी ताकद असल्याचे प्रतिनिधींनी मत व्यक्त केले.
पाणी व सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष
पावसाचे पाणी साठवण, पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता यावर सखोल चर्चा झाली. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे हे शाश्वत शहरांचे महत्त्वाचे अंग असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
अनुभवांचे आदानप्रदान
या परिषदेत सहभागी झालेल्या महापौर व उपमहापौरांनी त्यांच्या-त्यांच्या शहरांमध्ये राबविण्यात येत असलेली उत्तम प्रशासकीय मॉडेल्स, यशस्वी योजना आणि भेडसावणारी आव्हाने एकमेकांशी शेअर केली. यामुळे परस्पर अनुभवांचे आदानप्रदान झाले असून, इतर शहरांसाठीही अनुकरणीय मॉडेल्स समोर आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!