बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नोंदणी :‘सब-रजिस्ट्रारसह कब्जाधारकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी’


बेळगाव :
बनावट कागदपत्रे तयार करून ब्राह्मण समाजाच्या पिढीजात जमिनींचा बेकायदेशीर ताबा घेतलेल्या गंभीर प्रकरणांत केवळ कब्जाधारकांविरुद्धच नव्हे, तर त्या कागदपत्रांच्या आधारे जमीन नोंदणी करणाऱ्या सब-रजिस्ट्रारांविरुद्धही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टने केली आहे.
या संदर्भात आज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे आणि उपाध्यक्ष भरत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या सर्व जमीन नोंदणी व्यवहारांची सखोल चौकशी करावी. संबंधित सब-रजिस्ट्रारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच पीडित कुटुंबांना पोलिस संरक्षण देऊन त्यांच्या हक्कांची कायदेशीर पुनर्स्थापना करावी, अशी मागणी ट्रस्टने आपल्या निवेदनात केली आहे.

भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जमीन नोंदणी प्रक्रियेत कडक पडताळणी यंत्रणा लागू करावी, अशीही विनंती ब्राह्मण समाजाने केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या ब्राह्मण समाजाच्या पिढीजात मालमत्तांवर संघटित पद्धतीने बनावट हक्कपत्रे, खोट्या स्वाक्षऱ्या आणि मृत व्यक्तींना जिवंत दाखविणाऱ्या कागदपत्रांच्या माध्यमातून जमीन हस्तांतरण झाल्याच्या तक्रारी समोर आल्या असून त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः बेळगाव आणि खानापूरसह जिल्ह्यातील विविध भागांतील सब-रजिस्ट्रार कार्यालयांत कागदपत्रांची योग्य तपासणी न करता नोंदणी प्रक्रिया होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नोंदणी शक्य आहे का? अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाशिवाय हे कसे घडले?” असा प्रश्न ट्रस्टने आपल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

ट्रस्टचे खजिनदार रमेश कुलकर्णी, संयुक्त कार्यदर्शी विलास जोशी, संचालक मंडळ सदस्या अनुश्री देशपांडे, बी. आर. पाटील, जी. डी. जोशी, अशोक देशपांडे, प्रसाद कारजोल, डॉ. कुलकर्णी, अनिल कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

कायदेशीर कारवाई
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याच्या प्रकरणांना गांभीर्याने घेतले आहे. हुक्केरी येथे आधीच कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर तालुक्यांत घडलेल्या अशा प्रकरणांवरही योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.
मोहम्मद रोशन
जिल्हाधिकारी, बेळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!