विशाखापट्टणममध्ये फिट इंडिया सायकलिंग चॅम्पियनशिपसाठी बेळगावच्या सुमन आज्जी ब्रँड अॅम्बेसेडर
शांताई वृद्धाश्रमाला राष्ट्रीय गौरव; ज्येष्ठांच्या आरोग्य जनजागृतीसाठी आदर्श कार्य.
बेळगाव, दि.6:
केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानाअंतर्गत विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया सायकलिंग चॅम्पियनशिप कार्यक्रमासाठी बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमातील सुमन आज्जी यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही माहिती शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष तसेच माजी महापौर विजय मोरे यांनी शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने विशाखापट्टणम येथे झालेल्या कार्यक्रमात सुमन आज्जीना एक वर्षासाठी फिट इंडिया सायकलिंग चॅम्पियनशिपच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले. ही बेळगावसाठी अभिमानाची बाब असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले.

विशाखापट्टणम येथे आयोजित १० हजार सायकलिंग स्पर्धेला सुमन आज्जीनी शुभारंभ केला. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनशैली शक्य आहे असा संदेश देशभर पोहोचला, असे त्यांनी सांगितले.

गेल्या **२७ वर्षांपासून शांताई वृद्धाश्रम चालवला जात आहे. आश्रमातील आज्जी -आजोबांना दररोज व्यायाम, चालणे आणि आरोग्यविषयक उपक्रम करणे बंधनकारक आहे. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते,” असे विजय मोरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राजू गवळी, संतोष ममदापूर, मारिया मोरे, शरल मोरे, अलेन मोरे, गंगाधर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

